पर्यावरणाचे संतुलन

प्रस्तावना

views

4:13
तुम्ही कधी नदी, तलाव, ओढा अशा ठिकाणी गेला आहात का? तिथे तुम्हाला मासे, बेडूक, कुत्रा, पक्षी, कीटक, असे अनेक सजीव दिसले असतील. गवत, झाडे झुडपे, वेली, पाण्यातील शेवाळे दिसले असेल. वनस्पतीसुद्धा सजीवच आहेत. कारण यांचीही वाढ होत असते. त्याही मरण पावतात. सर्व वनस्पती व सर्व प्राणी एकसारखेच दिसतात का? त्यांचा रंग, आकार सर्व सारखेच वाटते का? नाही ना? ‘एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये जी विविधता दिसते, तिला तेथील जैवविविधता असे म्हणतात. जैवविविधता म्हणजे सजीवांमधील विविध जाती. झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक अनेक निरीक्षणे करतात. दिवस-रात्र, विविध ऋतूंमध्ये ते त्याचा अभ्यास करून नोंदी घेतात. उंच ठिकाणी राहणारे सजीव व पाण्यात खोल तळाशी राहणारे सजीव यांचे ते सतत निरीक्षण करत असतात. हे निरीक्षण ते विविध साधनांच्या मदतीने करतात. या अशा प्रकारची निरीक्षणे अनेक वैज्ञानिकांकडून जमा केली जातात. त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो. हे सर्व प्रयत्न अनेक वर्षांपर्यंत सातत्याने केले जातात. आणि शेवटी या वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री पटते. आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकांना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षांनंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले या मतावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते.