भरती- ओहोटी

भरती – ओहोटीचे प्रकार

views

3:41
पृथ्वीच्या बहुतेक भागात दिवसाकाठी दोन वेळा भरती व दोन वेळा ओहोटी येते. ही गोष्ट समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांच्या नेहमीच पाहण्यात येते. एका भरतीनंतर दुसरी भरती सरासरी १२ तास २५ मिनिटांनी येते. असाच प्रकार ओहोटीच्या बाबतीतही घडत असतो. ज्याप्रमाणे रोजच्या रोज भरतीच्या वेळा बदलतात, त्याचप्रमाणे भरतीची कक्षादेखील कमी – अधिक होत असते. सर्वसाधारणपणे अमावास्येला व पौर्णिमेला येणारी भरती ही सर्वात मोठी असते, तर शुक्ल किंवा कृष्ण पक्षांतील अष्टमीला येणारी भरती ही नेहमीपेक्षा लहान असते. तर अशा या भरती – ओहोटीचे एकूण दोन प्रकार आहेत. 1.उधाणाची भरती ओहोटी(Spring Tide) 2. भांगाची भरती- ओहोटी (Neap Tide). उधाणाची भरती – ओहोटी:- पौर्णिमा व अमावास्येच्या दिवशी चंद्र, सूर्य व पृथ्वी हे एका रेषेत असल्यामुळे त्यादिवशी भरती सर्वाधिक असते, त्यास ‘उधाणाची भरती’ असे म्हणतात. चंद्र व सूर्य यांच्या भरती निर्माण करणाऱ्या प्रेरणा अमावस्या व पौर्णिमेला एकाच दिशेत कार्य करतात त्यामुळे गुरुत्वाकर्षण बल वाढते. आणि त्यादिवशी उधाणाची भरती येते, जी सरासरीपेक्षा फारच मोठी असते. भरतीच्या ठिकाणी पाण्याचा फुगवटा अधिक झाल्यामुळे ओहोटीच्या ठिकाणी पाणी अधिक खोलपर्यंत ओसरते. त्यामुळे तिला उधाणाची ओहोटी असे म्हणतात. भांगाची भरती – ओहोटी अमावास्येपासून ते पौर्णिमेपर्यंत जे १५ दिवस असतात त्याला शुक्लपक्ष म्हणतात. तर पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंतचे जे १५ दिवस असतात त्याला कृष्णपक्ष म्हणतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरताना महिन्यातून दोन वेळा तो पृथ्वी व सूर्याच्या संदर्भात काटकोन स्थितीत येतो. ही स्थिती प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षांतील अष्टमीला येते. या दोन दिवशी भरती निर्माण करणाऱ्या चंद्र आणि सूर्य यांच्या प्रेरणा पृथ्वीवर काटकोन दिशेत कार्य करतात. त्यामुळे या दोन दिवशी चंद्र व सूर्य यांचे आकर्षण एक दुसऱ्यास पूरक न होता परस्पर काटकोनात असते. त्यामुळे ज्या ठिकाणी चंद्रामुळे भरती निर्माण होते, त्याचठिकाणी काटकोनात असलेल्या सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा परिणाम जाणवत असतो. त्यामुळे चंद्रामुळे निर्माण झालेल्या भरतीची पाण्याची पातळी नेहमीपेक्षा कमी वाढते तिला ‘भांगाची भरती’ असे म्हणतात.