सशस्त्र क्रांतिकारी चळवळ

अभिनव भारत

views

4:42
चाफेकर बंधू फाशी गेले, त्यावेळी सावरकर अगदी कोवळ्या वयाचे होते. या घटनेचा सावरकरांच्या संवेदनक्षम मनावर खूप मोठा प्रभाव पडला होता. ‘मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती करून अखेरच्या क्षणापर्यंत मी शत्रूशी लढत राहीन’. अशी त्यांनी आपल्या कुलदेवतेसमोर शपथच घेतली होती. १९०० मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे ‘मित्रमेळा’ ही क्रांतीकारांची गुप्त संघटना स्थापन केली. १९०४ साली याच संघटनेला ‘अभिनव भारत’ असे नाव देण्यात आले. लवकरच सावरकरांना इंग्लंडमध्ये क्रांतीचे कार्य करणारे श्यामजी कृष्ण वर्मा यांची शिवाजी स्कॉलरशिप मिळाली व ते कायद्याचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला गेले. तेथून त्यांनी अभिनव भारत संघटनेच्या भारतातील सदस्यांना क्रांतिकारी वाड्.मय, पिस्तुले यांसारखे साहित्य पाठविण्यास सुरूवात केली. वि.दा. सावकरांनी इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी या क्रांतिकारकाचे स्फूर्तिदायी चरित्र लिहिले. सन १९०७ मध्ये इंग्रज सरकारने १८५७ साली मिळालेल्या विजयाचा महोत्सव साजरा करण्याचे ठरविले. त्याला उत्तर म्हणून सावकरांनी ८ मे, १९०८ रोजी इंडिया हाऊसमध्ये ‘भारताच्या स्वातंत्र्याचे पहिले युद्ध’ म्हणून या घटनेचा महोत्सव साजरा केला. ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि हिंदी लोकांनी १८५७ साली दिलेला लढा हा ‘शिपायांचे बंड नसून तो स्वातंत्र्यलढा’ होता असे प्रतिपादन केले. अभिनव भारत संघटनेतील सदस्य इंग्रज सरकारच्या विरुद्ध लोकांच्यात असंतोष निर्माण करून त्यांच्यात स्वतंत्र्याभिमान जागृत करण्याचे कार्य करत आहेत, याची माहिती सरकारला मिळाली. त्यामुळे सरकारने बाबाराव सावरकर या अभिनव भारत संघटनेच्या नेत्यास अटक केली व त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली. याप्रकारे मोठी शिक्षा केल्यास दहशत निर्माण होईल असे सरकारला वाटत होते.