आपले समाजजीवन

समाज म्हणजे काय?

views

2:42
व्यक्ती हा समाजाचा मूलभूत घटक असतो. मानवाने अस्तित्वाच्या सुरक्षेसाठी समूहात राहायला सुरुवात केली. त्यातून समाज आणि सामाजिक जीवन अस्तित्वात आले. सर्व स्त्री-पुरुष ,प्रौढ ,वृध्द, लहान मुले-मुली , आपली कुटुंबे हे समाजाचे घटक आहेत. आपल्या कुटुंबाप्रमाणेच समाजात विविध गट, संस्था संघटना असतात. जसे कलाकार, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी ,शासकीय संस्था, पतसंस्था, नोकरी देणाऱ्या संस्था , सामाजिक, शासकीय संघटना इत्यादी. या सर्व लोकांमधील परस्पर संबंध , परस्पर व्यवहार, त्यांच्यातील देवाणघेवाण या सर्वांचा समावेश समाजात होतो. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही . तर, काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी लोक जेंव्हा एकत्र येतात , तेंव्हा त्यांचा समाज बनतो . गावामध्ये पाण्याची सोय व्हावी म्हणून जेंव्हा सर्वजण मिळून श्रमदान करतात तेंव्हा ते सर्व त्या समाजाचे भाग होतात. अन्न, वस्त्र , निवारा सुरक्षितता यांसारख्या गरजा भागविण्यासाठी समाजात शेती, व्यापार, उद्योग, शिक्षण अशा अनेक क्षेत्रात कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते अशा व्यवस्थांशिवाय दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. अन्नाचीगरज पूर्ण करण्यासाठी शेती करणे आवश्यक आहे . शेतातील धान्य शेतकरी पिकवतो. पण त्याने पिकवलेले अन्न आपल्या सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध संस्था काम करत असतात. शेतकऱ्याला मिळणारे बियाणे, शेतीची अवजारे, कीटक नाशक औषधे, शेतीसाठी लागणारे कर्ज या सर्व गरजा शेतकरी एकटाच पूर्ण करू शकत नाही. त्यासाठी त्याला विविध संस्थांची मदत घ्यावी लागते. म्हणून शासनाला शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका तसेच उत्पादित मालासाठी बाजारपेठा यांची व्यवस्था करावी लागते. विविध संस्था निर्माण करून विविध उद्योग सुरु करावे लागतात. आणि मगच अशा व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो.