स्वराज्य स्थापना

अफजलखानाचे पारिपत्य

views

2:29
अफजलखानाचे पारिपत्य :- शिवाजी महाराजांनी जसे आपल्या जहांगिरीतील किल्ले घेतले तसेच त्यांनी आदिलशाही प्रदेशातील किल्लेही घेण्यास सुरुवात केली. जावळीच्या मोरेंचा पराभव करून त्यांची प्रचंड संपत्ती लुटल्याने महाराजांनी आदिलशहाचा राग ओढवून घेतला होता. तसेच त्यांनी कोकण किनारपट्टी वरही स्वराज्यस्थापनेच्या कामांना गती दिली होती. या सर्व गोष्टींमुळे आदिलशाहीला आव्हान मिळाले होते. एक छोटासा मुलगा म्हणून त्यांनी शिवाजीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु महाराजांच्या वाढत्या पराक्रमांमुळे आदिलशाहाने त्यांचा बंदोबस्त करण्याचे ठरविले. त्यावेळी आदिलशाहीचा कारभार आदिलशाहाची आई बडी साहेबीन पाहात होती. तिने आदिलशाहीतील बलाढ्य, शूर, अनुभवी असा सरदार अफजलखान यास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. अफजलखान विजापूरहून वाई येथे आला . त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. अफजलखानाला शिवाजी महाराज फालतू व किरकोळ वाटत होते. तर शिवाजी महाराज ही आपण अफजलखानाला घाबरलो आहोत असे भासविण्याचा प्रयत्न करीत होते. वाईजवळील प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज व अफजलखान यांची १० नोव्हेंबर १६५९ रोजी भेट झाली. अफजलखान हा कपटी, म्हणून प्रसिद्ध होता. या भेटीत खान आपल्याला धोका देणार हे महाराजांना माहीत असल्याने महाराज पूर्ण तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते. खानाने महाराजांना आलिंगन (मिठी) दिल्यानंतर महाराजांच्या पाठीत कट्यारीने वार केला. परंतु चिलखत असल्याने महाराज बचावले. त्यांनी चपळाईने त्यांची वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला. त्याला ठार मारले व आदिलशाही सैन्याची दाणादाण उडवून देऊन त्यांचा पराभव केला. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली, त्यांना बक्षिसे दिली.