संतांची कामगिरी

संत रामदास

views

2:20
संत तुकाराम महाराजांच्या काळातच महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यातून ‘जय-जय रघुवीर समर्थ’ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी इ.स १६०८ मध्ये रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे संपूर्ण नाव ‘नारायण सूर्याजी ठोसर’ असे होते. ते रामाचे भक्त होते. म्हणून ते स्वत:ला रामाचा दास म्हणवू लागले. यावरूनच त्यांचे नाव समर्थ रामदास असे पडले. त्यांनी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश दिला. तसेच त्यांनी रचलेल्या मनाच्या श्लोकांतून त्यांनी लोकांना चांगले विचार व चांगले वर्तन कसे असावे याची शिकवण दिली. त्यांनी बलोपासनेसाठी म्हणजे शक्तीच्या उपासनेसाठी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले.’’ सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे! परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे! भगवंताचे! त्यांच्या या सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे ज्यात भगवंताचे अस्तित्व असेल अशी चळवळ निर्माण करणे. रामदासांनी समाजातील निराधार स्त्रिया, बालके यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. मुलांनो, साधुसंतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली, लोक अन्यायाला विरोध करू लागले. त्यांच्या मनात आपल्या धर्माबद्दलचा आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. याचा फायदा शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेसाठी झाला. थोडक्यात महाराष्ट्रातील संतांनी महाराष्ट्रातील लोकांच्या मनाची मशागत करून ठेवली होती. त्यात शिवरायांनी स्वराज्याचे बीज पेरले.