शिवरायांचे बालपण

शिवरायांचे बालपण

views

2:30
शिवरायांच्या जन्मापासून ते सहा वर्षाचे होईपर्यंतचा त्यांचा काळ धावपळीचा गेला. कारण शहाजीराजे असतील तेथे, त्यांना व जिजाबाईंना त्यांच्या बरोबर जावे लागे. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या देवापुढे दिवा लावत. त्या शिवबांना जवळ घेत. मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या, कृष्णाच्या, भीमाच्या आणि अभिमन्यूच्या पराक्रमाच्या, धाडसाच्या गोष्टी सांगत. तसेच कधी संत नामदेवांचे, संत ज्ञानेश्वरांचे तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषांच्या गोष्टी आवडत. ते लक्ष देऊन त्या ऐकत असत. त्यांना वाटे आपणही मोठे झाल्यावर शूर पुरूषांसारखे पराक्रम करावेत. त्याचबरोबर जिजाबाई त्यांना साधुसंतांच्या चरित्रांतील गोष्टीही सांगत. म्हणजे साधू संत कसे जीवन जगतात, त्यांनी कोणती शिकवण दिली, या सर्व गोष्टी त्या शिवरायांना सांगत असत. त्यातून शिवरायांच्या मनात साधूसंतांविषयी आदर निर्माण झाला. शहाजीराजांबरोबर असलेल्या मावळ्यांची - गरीब घरांतील मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधी कधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात असे. त्यांची कांदा भाकर आवडीने खात असे. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत असे. शिवबा हे सरदाराचे पुत्र असूनही त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. ते इतर मुलांसारखेच स्वत:ला मानत असत. याचे कारण म्हणजे जिजाबाईंनी त्यांना दिलेली समानतेची शिकवण होय. मावळ्यांची मुले रानातील पक्ष्यांप्रमाणे नेहमी रानात फिरत असत. त्यामुळे त्यांना पोपट, कोकीळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढता येत असत.