स्वराज्यस्थापनेची प्रतिक्षा

मावळांतील सोबती

views

2:08
बारा मावळ परिसरात ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपल्याला मिळालेली वतने सांभाळत बसली होती. त्यांचे त्यांच्या वतनावर खूप प्रेम असे. आपले वतन आपल्या हातातून जाऊ नये, म्हणून ते खूप प्रयत्न करत. वतनासाठी ते आपापसात भांडत. त्यांच्या या भांडणात जिंकणारेही मराठे असत व हारणारेही मराठेच असत. त्यामुळे या भांडणात मराठयांची शक्ती विनाकारण वाया जात आहे, हे शिवरायांनी ओळखले. ही शक्ती स्वराज्याच्या कामी लावण्यासाठी त्यांनी वतनदारांमधील भांडणांना आळा घालायचे ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत. देशमुखांची समजूत घालत. त्यांना स्वराज्याविषयी माहिती सांगत. त्यांचे बोलणे ऐकून देशमुख भारावून जात असे. शिवरायांनी त्यांना प्रेमाने, गोड शब्दांनी आपलेसे केले. पण काहींनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही. ते शिवरायांचे शब्द मानायला तयार नव्हते, स्वराज्याच्या कामी उपयोगी पडण्यास ते तयार नव्हते. अशांनाही महाराजांनी वठणीवर आणले. त्यांनाही आपल्यात सामील करून घेतले. मराठयांचे आपापसातील वाद, भांडणे शिवरायांनी थांबविली. त्यामुळे मावळ भागात शांतता निर्माण झाली. त्यामुळे जो तो शिवरायांचे आभार मानू लागला. मावळ प्रांतात एकी निर्माण होऊ लागली. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे, बांदल इ, देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. महाराज सांगतील त्याप्रमाणे वागू लागली. अशा तऱ्हेने मावळ प्रांतात स्वराज्याची घोडदौड सुरु झाली.