सागरतळ रचना

महासागराची तळरचना

views

3:29
जलमग्न जमिनीची रचना म्हणजे ‘सागरतळ रचना’ होय. जलमग्न म्हणजे पाण्यात बुडालेली जमीन. सागरतळरचना समुद्रसपाटीपासून असलेल्या खोलीच्या आधारे व तेथील जमिनीच्या आकारानुसार विचारात घेतली जाते. जसे भूपृष्ठावरील पर्वतांची उंची मोजली जाते, तसेच महासागरांची खोली मोजली जाते. महासागराची सरासरी खोली सुमारे ३७०० मीटर आहे. महासागराचा तळ भूमी प्रमाणेच उंच-सखल आहे. सागरतळ रचना ही सर्व सागरांची एकसारखी नसते. तर ती विविध महासागरांची वेगवेगळी असते. या रचनेतील काही ठळक व प्रमुख भूप्रकार व त्यांचा सर्वसाधारण क्रम आता आपण पाहूया. समुद्राच्या किनारी भागापासून आपण जसजसे आत खोल समुद्रात जाऊ तसतसे भूरचनेत बदल होत जातात. त्यांचा अभ्यास आपण करणार आहोत.भूखंड मंच: “किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेला जमिनीचा भाग म्हणजे भूखंड मंच होय’’हा सागरतळाचा सर्वात उथळभाग आहे. या भागालाच समुद्रबुड जमीन असेही म्हणतात. या भागाचा उतार मंद असतो.भूखंड मंचाचा विस्तार सर्वत्र सारख्या स्वरूपाचा नसतो. काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो अरुंद, तर काही खंडांच्या किनाऱ्याजवळ तो शेकडो किलोमीटरपर्यंत रुंद असतो. याची खोली साधारणत: समुद्रसपाटीपासून सुमारे २०० मीटरपर्यंत असते. म्हणजेच भूखंड मंच जास्त खोल नसतो.मानवी जीवनाचा विचार करता भूखंडमंच खूप महत्त्वाचा आहे. कारण जगातील मासेमारी करण्याची विस्तृत व पसरलेली क्षेत्रे या भूखंडमंचावरच आढळतात. भूखंडमंच उथळ स्वरूपाचा असल्याने सूर्यकिरण भूखंडाच्या तळापर्यंत पोहचतात. त्यामुळे भूखंडमंचावर शेवाळ, प्लवंक यांची निर्मिती होते. शेवाळ, प्लवंक ही माशाची खाद्ये असल्याने अन्नाच्या शोधासाठी मासे सतत या भागात वावरत असतात. त्यामुळे त्या भागात मासेमारी हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे चालतो. तसेच खनिज तेल, नैसर्गिक वायू व विविध खनिजे भूखंडमंचावरून खोदकाम करून मिळवता येतात.