बादशहाच्या हातावर तुरी दिल्या

पेटाऱ्यातून पसार झाले

views

4:45
पेटाऱ्यातून पसार झाले- महाराजांच्या पहाऱ्यावरील पाहारेकरी, महाराजांनी तंबूतून पाठविलेले पेटारे महालाबाहेर पडताना दरवाजावर नेहमी तपासून पाहत असत. असे ते रोज करीत असत. शेवटी-शेवटी तेही कंटाळले. रोजरोज काय पाहायचे पेटारे उघडून? रोज तर त्यात मिठाईच असते. असे त्यांना वाटू लागले. पुढे-पुढे ते पेटारे उघडून पाहण्याचा कंटाळा करू लागले. महाराजांना लक्षात आले की पहारेकरी आता पेटारे उघडून पाहत नाहीत, याच गोष्टीचा फायदा त्यांनी घ्यायचा ठरविला. एके दिवशी सायंकाळच्या वेळी शिवरायांनी हिरोजी फर्जंद याला आपल्या जागी झोपवले. त्याचे सर्व अंग झाकेल असे त्याच्या अंगावरती पांघरूण घातले आणि मदारीस त्याचे पाय चेपवत बसविले. पाहणाऱ्याला वाटावे की शिवराय झोपलेत व मदारी त्यांचे पाय चेपतो आहे. (ही घटना १७ ओगस्ट १६६६ रोजीची) त्यानंतर शिवराय व त्यांचे पुत्र संभाजीराजे एकेका पेटाऱ्यात बसले. त्यांचे पेटारे निघाले. सुदैवाने पेटारे कोणीही तपासले नाहीत. पुढे जे ठरलेले ठिकाण होते त्याठिकाणी ते पेटारे सुखरूप पोहचले. मुलांनो, एवढ्या मोठ्या औरंगजेब बादशाहाच्या तावडीतून एकाही माणसाचा जीव न गमवता निसटणे म्हणजे ही साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली ती मदारी व हिरोजी फर्जंद यांनी. स्वत:चा जीव धोक्यात घालून या दोघांनी महाराजांना कैदेतून सोडविण्याचे काम केले. धन्य ते शिवराय व धन्य ते त्यांचे मावळे. पुढे वातावरण शांत झाल्यावर दोन महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडास येऊन पोहचले. अशा प्रकारे आपल्याकडे शत्रूइतकी ताकद नसतानाही फक्त युक्तीच्या जोरावर महाराज औरंगजेब बादशाहाच्या हातावर तुरी देऊन निसटले. ही घटना सन १६६६ मध्ये घडली.