शर्थीने खिंड लढवली

बाजीने शत्रूला रोखले

views

03:57
जिवावर दगड ठेवून अतिशय जड अंतकरणाने बाजीप्रभूला खिंडीत मागे ठेवून शिवराय विशाळगडाकडे निघाले. बाजीने शिवरायांच्या पाठमोऱ्या मूर्तीला लवून मुजरा केला. मग त्याने आपली तलवार घेतली आणि तो खिंडीच्या तोंडाशी उभा राहिला. त्याने मावळयांच्या तुकडया पाडल्या. त्यांना जागा नेमून दिल्या. मावळ्यांनी दगड-गोटे जमा केले आणि ते आपापल्या जागी शत्रूची वाट बघत तयारीत उभे राहिले. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार झाली. इतक्यात शत्रूच्या युद्धगर्जना ऐकू आल्या. शत्रू खिंडीखाली आला. तसा बाजी मावळ्यांना म्हणाला, “बहादूर मर्दानो, हुशार ! जीव गेला तरी जागा सोडू नका. गनिमांना खिंड चढू देऊ नका.’’ बाजीप्रभू आणि त्याचे मावळे खिंडीच्या तोंडाशी पाय रोवून उभे राहिले. खिंडीची वाट अवघड व अतिशय चिंचोळी व नागमोडी होती. एका वेळी तीन-चार माणसे कशी तरी वर चढू शकत. तिकडे शिवराय व त्यांच्याबरोबरच मावळे वा-याच्या वेगाने विशाळगडाकडे धावत होते. विशाळगडाचा पायथा अजून दूर होता. गडावर पोहचण्यासाठी शिवरायांना अजून दीड-दोन तास हवे होते. तेवढा वेळ बाजीने खिंड अडवून ठेवल्यास शिवरायांचे काम पूर्ण होणार होते.