आपणच सोडवू आपले प्रश्न

तंटानिवारण, समस्या निवारण

views

3:07
‘तंटा” म्हणजे भांडण. आपल्या गावात, शहरात, किंवा दूरदर्शनवर रोज आपण तंटयाविषयी काही ना काही बातम्या ऐकतच असतो. त्यामुळे तंटा ही सुद्धा एक समस्याच म्हणावी लागेल. तंट्यामुळे आपापसांत वाद होतात. तसेच राज्या-राज्यांमध्ये, देशा-देशांमध्ये सुद्धा तंटे होतात. नदीच्या पाणी वाटपावरून असे तंटे निर्माण होतात की, त्यामुळे ही समस्या केवळ गावापुरतीच, किंवा शहरापुरतीच मर्यादित रहात नाही. तर तंटा ही खूप व्यापक समस्या आहे. तंट्यामुळे एकमेकांविषयी द्वेष निर्माण होतो.तंट्यामुळे गावात असुरक्षितता निर्माण होते. काही-काही तंटे तर इतकी भयावह स्थिती निर्माण करतात की समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरते. काही तंटे हे आपण एकमेकांसोबत बोलून सामोपचाराने, सामंज्यस्याने सोडवू शकतो. पण जर हे एकमेकांशी बोलून तंटे सुटत नसतील तर त्यावेळी आपल्याला न्यायालयाचा आधार घ्यावा लागतो. न्यायालयाच्या मदतीने तंटे सोडवता येतात. परंतु न्यायालयीन प्रक्रिया खूप वेळखाऊ आणि खर्चिक असते. त्यामुळे आपल्याला तंटा सोडविण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा गावातल्या गावात, विभागातल्या विभागात तंटा सोडविण्याचे प्रयत्न करायला पाहिजेत.गाव पातळीवर दाखल असणारे व नव्याने निर्माण होणारे तंटे सामोपचाराने मिटविण्याच्या उद्देशाने राबविल्या जाणाऱ्या मोहिमेस ‘तंटामुक्ती अभियान’ असे म्हणतात. आपल्या महाराष्ट्र राज्यात १५ ऑगस्ट २००७ पासून ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याविषयी आपण अधिक विस्ताराने जाणून घेऊया. १५ ऑगस्ट २००७ पासून गावातील तंटे गावातच, गावकऱ्यांच्या चर्चेने आणि सामंजस्याने सोडवले जावे हा हेतू समोर ठेवून “महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना” राबविण्यात आली आहे. या मार्गाने तंटे सोडवले तर गावामध्ये एकोपा वाढतो. शासनाकडून अशा तंटामुक्त गावांना “शांतता पुरस्कार” दिले जातात.