शायिस्ताखानाची फजिती

शायिस्ताखानाची खोड मोडली

views

4:10
शायिस्ताखानाची खोड मोडली : लाल महालाच्या भिंतीला मोठे भगदाड पाडून शिवराय आत महालात शिरले. त्यांना त्या वाड्याचा कानाकोपरा व खडान्खडा माहिती होती. शिवराय आत शिरत होते, तेव्हा खानाचे पहारेकरी पेंगत होते. त्या पेंगणाऱ्या पहारेक-यांना शिवरायांच्या माणसांनी बांधून टाकले. शिवराय आणखी आत महालात शिरले. इतक्यात कोणीतरी व्यक्ती तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला. शिवरायांनी त्याला जागेवरच ठार केले. त्यांना वाटले तो शायिस्ताखान असावा, पण तो त्याचा मुलगा होता. शिवरायांच्या हेराने अचूकपणे त्यांना शायिस्ताखानाच्या झोपण्याचा महल सांगितला होता. शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले. त्यांनी आपली तलवार उपसली. शायिस्ताखान जागा झाला. समोर शिवरायांना पाहून तो घाबरला. सैतान! सैतान! असे ओरडून तो खिडकीतून पळून जाऊ लागला. शिवरायही त्याच्या मागोमाग धावले. शायिस्ताखान खिडकीतून बाहेर उडी टाकणार, तेवढयात शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाचे नशीब चांगले म्हणून तो जीवावर बेतणारा वार त्याच्या बोटांवर गेला. खानाच्या उजव्या हाताचा अंगठा व करंगळीच्या मधली तीन बोटे कापली गेली. खानाच्या प्राणावर हा वार बसणार होता पण तो बोटावर निभावला. खान खिडकीतून उडी टाकून पळाला. शिवराय सिंहगडावर विजयी होऊन आले. त्याचा आनंद तोफा उडवून साजरा करण्यात आला. स्वराज्यातील व विशेषकरून पुणे व आसपासच्या परिसरातील संकट दूर झाले होते. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आनंदीआनंद वाटू लागला. मुलांनो, अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शयिस्ताखानाची खोड मोडलीच, त्याचबरोबर औरंगजेबलाही शिवाजी महाराज कोण आहेत ते दाखवून दिले.