महायुदधोत्तर राजकीय घडामोडी

शीतयुद्धानंतरचे जग

views

4:32
१९९१ मधील सोव्हिएत युनियनच्या विघटनाबरोबर शीतयुद्ध संपले. एकेकाळी महासत्ता असणाऱ्या या साम्राज्याचे विघटन होऊन नवीन १५ राष्ट्रे उदयास आली. त्यामुळे जागतिक राजकारणात महत्त्वाचे बदल घडून आले. 1. सोव्हिएत युनियनच्या विघटनामुळे जागतिक राजकारणात अमेरिका ही एकमेव सत्ता उरली. 2. शीतयुद्ध संपल्यामुळे जगातील तणाव कमी झाला. त्यामुळे राष्ट्राराष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध वाढण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. भांडवल, श्रम, बाजारपेठ माहिती यांचा जगभर प्रसार झाला. तसेच लोकांमधील विचार व कल्पना यांचाही मुक्त संचार होऊन विचारांची व माहितीची देवाण-घेवाण सुरू झाली. 3. सर्वच राष्ट्रांनी आपापसात व्यापारी संबंध प्रस्थापित करण्याला महत्त्व दिले. त्यामुळे मदत किंवा उपकार करण्याची कल्पना मागे पडली. त्याऐवजी आर्थिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊ लागले. दोन राष्ट्रांमध्ये देवाण घेवाण होऊन आर्थिक संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. उदा: पूर्वी आपल्या विरोधातील एखाद्या देशाला ‘शत्रूराष्ट्र’ असे म्हटले जाई. परंतु स्पर्धक राष्ट्र असे म्हणणे ही संकल्पना पुढे आली. 4. शीतयुद्धानंतर युद्धोत्तर काळात स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेला जागतिक शांतता व सुरक्षितता टिकविण्यासाठी अधिक ठोस प्रयत्न करावे लागत आहेत. 5. पर्यावरण रक्षण, मानवी हक्कांची जोपासना, स्त्री – पुरुष समानता, नैसर्गिक आपत्तींचा सामना करणे या बाबींना जागतिक स्वरूप प्राप्त झाले. म्हणजेच हे प्रश्न एखाद्या देशापुरते, प्रदेशापुरते मर्यादित न राहता ते जगाचे प्रश्न बनले. ते सोडविण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करू लागले. अशा तऱ्हेने शीतयुद्धानंतर जागतिक राजकारणात अनेक महत्त्वाचे बदल घडून आले.