स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

स्थानिक वेळ

views

2:33
आता आपण स्थानिक वेळ समजून घेणार आहोत. आपण खांबाच्या सावलीचा प्रयोग पाहिला. त्यातून आपल्याला समजले की सूर्योदयानंतर जसजसा सूर्य अकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते. सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी म्हणजे दुपारी सावलीची लांबी सर्वात कमी असते. मध्यान्हानंतरच्या काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळी पुन्हा आपली सावली लांब होत जाते. पृथ्वीवर, मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुववृत्तापासून ते दक्षिण ध्रुववृत्तापर्यंत सर्वत्र सारखीच असते. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान जेव्हा एखादे रेखावृत्त बरोबर सूर्यासमोर येते, तेव्हा त्या रेखावृत्तावर त्या वेळेला मध्यान्ह म्हणतात. रेखावृत्तावरील मध्यान्ह वेळ ही त्या रेखावृत्तावरील स्थानिक वेळ मानली जाते. थोडक्यात, “एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय” ध्रुववृत्तापासून ध्रुवापर्यंतच्या प्रदेशात मात्र ऋतुमानाप्रमाणे दिनमान तासांपेक्षा अधिक असू शकते. त्यामुळे या भागात सूर्योदय, मध्यान्ह , सूर्यास्त व मध्यरात्र या वेळा समजून घेणे आवश्यक ठरते. उत्तर व दक्षिण ध्रुवावर मात्र ६ महिने दिनमान असते. आणि ६ महिने रात्रमान असते. उत्तर व दक्षिण ध्रुवावर सूर्य दररोज उगवताना किंवा मावळताना दिसत नाही. तो विशिष्ट तारखेलाच उगवतो आणि मावळतो. त्यामुळे ध्रुवावर सूर्योदय किंवा सूर्यास्त यांची वेळ सांगताना तारीख सांगावी लागते. ध्रुवांवर सूर्य आकाशात विशिष्ट तारखेला उगवल्यानंतर तो सातत्याने ६ महिने क्षितिजावर तिथल्या तिथे घिरट्या घालत असल्यासारखा फिरतो. तर ६ महिन्यांच्या कालावधीसाठी सूर्यदर्शनच होत नाही. त्यामुळे ध्रुवावर सावली व सावलीची लांबी यांचा विचार मध्यान्ह वेळेसाठी करता येत नाही.