बाह्यप्रक्रिया भाग २

नदीचे वहन व संचयनकार्य

views

5:28
नदी डोंगराळ किंवा पर्वतीय प्रदेशात उगम पावते. तेथून ती कमी उताराच्या प्रदेशात वाहत येते. नदी पर्वताच्या पायथ्यापर्यंत वाहत आल्यानंतर उतारात बदल झाल्यामुळे नदीतील भरड गाळाचे संचयन पर्वताच्या पायथ्याशी होते. त्रिकोणी आकारात होणाऱ्या या संचयनातून पंखाकृती मैदाने तयार होतात. पंखाकृती मैदानाची जरा सविस्तर माहिती घेऊ. पर्वतीय प्रदेशातून वाहणारी नदी जेव्हा मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिचा वेग एकदम कमी होतो. त्यामुळे नदीने वाहून आणलेला गाळ तिच्या पात्रात साचतो. हे संचयन एखाद्या पंखासारखे दिसते म्हणून यास पंखाकृती मैदाने असे म्हणतात. चित्रात तुम्हाला ते दिसत आहेत. निमशुष्क प्रदेशात अशी मैदाने पाहायला मिळतात. हिमालयाच्या पायथ्याशी विशेषत: शिवालिक रांगा सोडून नद्या उत्तर भारतीय मैदानी भागात येतात, तेथे विशेषकरून अशी मैदाने आहेत, उदा. कोसी नदीने केलेले पंखाकृती मैदान. उगमस्थानापासून पर्वताच्या पायथ्यापर्यंत नदीचा वाहण्याचा वेग तीव्रउतारामुळे जास्त असतो. परंतु नदी पायथ्याशी आल्यानंतर मंद उतारामुळे नदीचा वेग कमी होतो. त्यामुळे ती संथपणे वाहू लागते. नदीमार्गात एखादा लहानसा अडथळा जरी आला तरी नदी वळण घेऊन पुढे जाते. अशा तऱ्हेने वेग कमी झाल्याने नागमोडी वळणे घेत-घेत नदीचा प्रवाह पुढे जात असतो. अशा प्रकारे नदी समुद्राजवळ पोहोचेपर्यंत तिचे पात्र खूप रुंद होते, पण तिचा वेग खूपच कमी होतो. कारण नदी आपल्या उगमस्थानापासून आपल्या बरोबर भरपूर गाळ घेऊन येते. तसेच तिला अनेक लहान-मोठे जलप्रवाह येऊन मिळत असतात. नदीतला गाळ तिच्या पात्रात व दोन्ही काठांवरील प्रदेशात साचतो. नदीतील गाळाचे संचयन होण्यासाठी नदीची लांबी, त्या नदीत असेलेले पाण्याचे प्रमाण, नदीतील गाळाचे प्रमाण आणि भूपृष्ठाचा व नदीचा उतार इ. घटक महत्त्वाचे ठरतात. अशा प्रकारे गाळाचे संचयन झाल्यामुळे नदीपात्राच्या आजूबाजूस पूरतट व पूरमैदाने तयार होतात.