पदार्थ, वस्तू आणि उर्जा

पदार्थाच्या अवस्था

views

4:34
पदार्थाच्या तीन अवस्था असतात: स्थायू, द्रव, वायू या त्या तीन अवस्था होत. त्यांची आपण उदाहरणे पाहू. लाकूड हे स्थायू आहे. पाणी हे द्रवरूप आहे. तर पाण्याची वाफ हे वायुरूप आहे. मुलांनो निसर्गातील पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तिन्ही अवस्थांमध्ये आढळते. पाण्याचे बर्फ रूप हे स्थायू आहे. पाणी हे द्रव तर पाण्याची वाफ हे वायू रूप आहे. अशा प्रकारे पाणी हे तिन्ही रूपांत आढळते. पाण्याचे रूप किंवा अवस्था बदलली तरी या तीनही अवस्थांमध्ये पाण्याचा प्रत्येक कण एकसारखा असतो. तथापि स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थांमध्ये त्यांची मांडणी वेगवेगळी असते. हे तुम्हांला समोर दिलेल्या आकृतींवरून लक्षात येईल. पाण्याची तिन्ही अवस्थांमधील मांडणी वेगळी असते. त्यामुळे बर्फ, पाणी आणि बाष्प यांच्यातील गुणधर्मांतही फरक दिसून येतो. निसर्गात आढळणारे सर्व पदार्थ कणरूप असतात. मग तो वरील कोणत्याही अवस्थेमध्ये असला तरी तो कणांपासून बनलेला असतो. सामान्यपणे प्रत्येक पदार्थ एका ठराविक अवस्थेत असतो. त्या पदार्थाच्या अवस्थेवरून त्या पदार्थाला स्थायू, द्रव किंवा वायू पदार्थ म्हणतात. उदा. अॅल्युमिनियम, कोळसा, लाकूड, साखर हे स्थायू आहेत. केरोसीन, पेट्रोल, दूध, पाणी हे द्रव आहेत. तर नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड हे वायू आहेत. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात. उदा. कठीणपणा, पारदर्शकता, रंग, वास, चव, पाण्यात विरघळणे असे विविध गुणधर्म असतात. साखर, मीठ पाण्यात विरघळते. विरघळणे हा त्या पदार्थाचा गुणधर्म आहे.