पदार्थ, वस्तू आणि उर्जा

ऊर्जा

views

3:51
आपण उठल्यापासून झोपेपर्यंत अनेक प्रकारची कामे करीत असतो. ही सर्व प्रकारची कामे करण्यासाठी आपल्याला शक्तीची म्हणजेच ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा कशी निर्माण होते व तिचा वापर कसा केला जातो, याची माहिती आपण घेणार आहोत. विविध पदार्थांपासून आपण अनेक प्रकारच्या आपल्याला उपयोगी पडतील अशा वस्तू बनवितो. पदार्थांचा आपल्याला असा उपयोग होत असला तरी पदार्थाचा आणखी एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे पदार्थांपासून ऊर्जा मिळते. मुलांनो ही एक गाडी उभी आहे. तिच्यात इंधन भरले आहे. म्हणजे पेट्रोल किंवा डिझेल भरले आहे. परंतु ती पुढे चालू शकत नाही. असे का होते? तर पाहा. फक्त मोटारगाडीत इंधन असून चालणार नाही. तर त्या इंधनाचे ज्वलन होणे गरजेचे आहे. इंधनाच्या ज्वलनातून कार्य करण्याची क्षमता, म्हणजेच ऊर्जा मुक्त होते. म्हणजे गाडीत पेट्रोल किंवा डिझेल घातल्यानंतर गाडी चालू केल्यानंतर त्यात ऊर्जा निर्माण होऊन मगच गाडी पुढे – पुढे चालू शकते. पेट्रोल संपले किंवा त्याचे ज्वलन थांबले म्हणजे आपण गाडी बंद केली की गाडीही थांबते. इंधनाच्या ज्वलनातून उष्णतेच्या स्वरूपात ऊर्जा मिळते. म्हणून गाडीत नुसते इंधन असून भागत नाही तर त्याचे ज्वलन होऊन त्यातून ऊर्जा निर्माण होणेसुध्दा खूप गरजेचे आहे. आपण खूप धावलो की दमतो व आपल्याला थांबावे लागते. शरीरातील ऊर्जा खर्च झाल्यामुळे आपल्याला थकवा येतो. मुलांनो आजचे युग हे यंत्राचे युग आहे. आज नव-नवीन यंत्रांचा शोध लागत आहे. यातील अनेक यंत्रे इंधनांचा उपयोग करून चालवता येतात. या यंत्रांमध्ये इंधन म्हणून कोळसा, डिझेल, सीएनजी, एलपीजी, पेट्रोल, यांचा वापर केला जातो. या सर्व पदार्थांपासून उष्णतेच्या रूपात ऊर्जा प्राप्त होते. दगडी कोळशाचा वापर रेल्वे चालविण्यासाठी तसेच मोठ – मोठया कारखान्यांत इंधन म्हणून केला जातो. “धावणाऱ्या व्यक्ती किंवा धावणाऱ्या गाड्यांमध्ये उष्णतेचे रूपांतर गतीच्या स्वरूपात होते. गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला ‘गतिज ऊर्जा’ असे म्हणतात.” आपल्या अवतीभोवती असलेल्या सर्व गतिमान वस्तूंमध्ये गतिज ऊर्जा असते.